श्राद्ध, किती प्रकारचे असतात? श्राद्धाविषयी काही ढोबळ नियम
श्राद्ध, किती प्रकारचे असतात?*
—————————— —————-
हिंदू धर्मामध्ये श्राद्ध पितरांना प्रसन्न करण्याचा एक महत्त्वपूर्ण विधी आहे. श्राद्धाच्या माध्यमातून आपण पितरांचे स्मरण करून यांच्या शांतीसाठी धार्मिक कर्म करतो.
*धर्म ग्रंथांमध्ये श्राद्धाचे विविध प्रकार सांगण्यात आले असून प्रत्येकाचे वेगवेगळे महत्त्व आहे.*
भविष्य पुराणानुसार श्राद्धाचे १२ प्रकार आहेत…
१-नित्य,
२- नैमित्तिक,
३- काम्य,
४-वृद्धि,
५- सपिण्डन,
६- पार्वन,
७- गोष्ठी,
८-शुद्धर्थ,
९-कर्मांग,
१०- दैविक,
११-यात्रार्थ,
१२-पुष्टयर्थ
*श्राद्धाचे प्रमुख अंग याप्रकारे आहेत -*
*१) तर्पण-*
यामध्ये दुध, तीळ, कुश, पुष्प,गंध मिश्रित पाणी पितरांना तृप्त करण्यासाठी अर्पण केले जाते. श्राद्ध पक्षात हे दररोज करण्याचे विधान आहे.
*२) भोजन आणि पिंडदान-*
पितरांसाठी ब्राह्मणांना अन्नदान केले जाते. श्राद्ध करताना तांदळाचे पिंडदान केले जाते.
*३) वस्त्रदान-*
वस्त्र दान करणे श्राद्धाचे एक मुख्य कर्म आहे.
*४) दक्षिणा -*
यज्ञाची पत्नी दक्षिणा आहे. जोपर्यंत जेवण देऊन वस्त्र आणि दक्षिणा दिली जात नाही तोपर्यंत त्याचे फळ मिळत नाही.
*श्राद्धाविषयी काही ढोबळ नियम*
—————————— —————–
१) श्राद्धकर्मासाठी श्राद्धाची तिथी अपराह्णकाळी म्हणजे सामान्यपणे दुपारी दीड ते चार या काळात, ज्या दिवशी असेल त्या दिवशी सकाळी श्राद्ध तिथी नसताना सुद्धा सकाळ पासून दुपारी दोन – तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राद्धकर्म करता येते.
२) एकाच दिवशी म्हणजे एकाच तिथीला आई-वडीलांचे श्राद्ध करावयाचे असेल तर प्रथम वडीलांचे श्राद्ध करून नंतर आईचे श्राद्ध करावे. अशा वेळेस दोन्ही श्राद्धांसाठी स्वतंत्र स्वयंपाक करावा. ते शक्य नसेल तर किमान भात व खीर स्वतंत्र करावी आणि इतर स्वयंपाक एकत्र करून त्याचे दोन स्वतंत्र भाग काढून ठेवावेत व श्राद्धाच्या वेळी त्या त्या भागावर प्रोक्षण करावे.
३) अपघातामुळे घरातील ३-४ व्यक्ती एकाच वेळी मृत झाल्यास त्यांची श्राद्ध तिथी एकच असणार. अशा वेळी एकाच कर्त्याने तीन-चार श्राद्धे एकाच दिवशी स्वत: करु नयेत. श्राद्धाच्या अधिकाराप्रमाणे क्रमाने योग्य अशा व्यक्तीने उर्वरीत श्राद्ध/श्राद्धे करावीत.
४) जर श्राद्ध करण्यास अन्य कोणीही उपलब्ध नसेल तर पहिल्या दिवशी २ श्राद्धे करुन नंतर दुसऱ्या दिवशी उर्वरीत १-२ श्राद्धे करावीत.
५) महालय व श्राद्ध एकाच दिवशी असेल तर प्रथम श्राद्ध करावे व नंतर महालय करावा.
दर्शश्राद्ध आणि श्राद्ध एकाच दिवशी असेल तर प्रथम श्राद्ध करावे आणि नंतर दर्शश्राद्ध करावे.
६) पितृपक्षातील श्राद्ध त्या विशिष्ट तिथीस करावे. त्या तिथीस करणे शक्य नसल्यास पितृ पक्षातील चतुर्दशीचा दिवस सोडून अन्य कोणत्याही दिवशी करावे.
७) काही कारणाने पितृपक्षात श्राद्ध करणे जमले नाही तर पंचांगात दिलेल्या महालय समाप्तीपर्यंत कोणत्याही दिवशी पितृ पक्षातील करावयाचे राहिलेले श्राद्ध करावे.
८) एखाद्या व्यक्तीचे अंत्यकर्म ज्या गावात केले असेल त्याच गावात १०, ११, १२ व१३ व्या दिवसांचे कर्म करावे असे नसून कोणत्याही ठिकाणी त्या दिवसांचे श्राद्धकर्म करता येते. तसेच, दरवर्षीचे श्राद्ध किंवा पितृपक्षातील श्राद्ध सुद्धा कोणत्याही ठिकाणी करता येते.
–