शमी वृक्षाचे महत्त्व – डॉ हेमंत सहस्त्रबुद्धे
शमी–
अत्यंत महत्वाचा लेख आहे मित्रांनो. नक्की वाचा. संग्रही ठेवा आणि शेअर सुद्धा करा …….
मंडळी दशहरा अर्थात आपला लाडका दसरा जवळ आला आहे. पण दसरा साजरा करण्याच्या धामधुमीत हा लेख वाचला जाणार नाही म्हणून आजच तुमच्या समोर सादर करतो आहे. पांडवांनी अज्ञातवासात जाताना त्यांची शस्त्रे शमीच्या झाडावर लपवून ठेवली होती हे आपण लहानपणी वाचलेले, ऐकलेले आहे. शमीचेच झाड का निवडलेले असावे त्यांनी? शमी याचा अर्थ आहे जे आधीच्या गोष्टी काढून टाकते ते किंवा जे स्वच्छ करते ते. पौराणिक काळात हिंदू राजे शमीचे पूजन करत असत.
शमीचे शास्त्रीय नाव आहे “Prosopis spicigera Linn”. कमी पावसाच्या प्रदेशात शमीची झाडे जास्त असतात. राजस्थान मधे शमीच्या झाडाला “पवित्र वृक्ष” असा दर्जा आहे. आपल्याकडे महाराष्ट्रात नारळाला जसे कल्पवृक्ष म्हंटले जाते तसे पाणी कमी आणि वाळवंटी भाग जास्त असलेल्या राजस्थानात शमीच्या झाडाचा गुरांच्या चाऱ्यासाठी आणि माणसांना सुद्धा अन्न म्हणून अतिशय उपयोग होत असल्याने तिथे शमीच्या झाडाला फार फार महत्व आहे. पूर्वी कौरव-पांडवांचे राज्य याच परिसरात होते. अर्थातच तेव्हा तिथे ही शमीची झाडे जास्त असण्याची दाट शक्यता आहे. दक्षिणेकडील कर्नाटक मधील म्हैसूर येथील राजा एक मोठी मिरवणूक काढून शमी वृक्षाजवळ जातो आणि सहकुटुंब त्याची पूजा-अर्चना आणि प्रार्थना करतो. परत जाताना शमीची एक फांदी राजवाड्यात घेऊन जातो. विजयनगरच्या राजांनी [ कृष्णदेवराय आणि त्याचे वंशज] शमीच्या झाडाच्या पूजनासाठी मिरवणूक काढण्याची ही धार्मिक प्रथा सुरु केली होती. या राज्याचे पतन झाल्यावर म्हैसूरच्या राजाने ही प्रथा १६ व्या शतकात श्रीरंगपट्टण इथे सुरु केली. नंतर श्रीरंगपट्टणटिपू सुलतानाच्या ताब्यात गेल्यावर म्हैसूर इथे ही मिरवणूक काढली जाऊ लागली.
शमीचे पूजन करताना …..
शमी शमयते पापम् शमी शत्रुविनाशिनी ।
[ शमी लोहितकंटक असा एक पाठभेद आहे ]
अर्जुनस्य धनुर्धारी रामस्य प्रियदर्शिनी ॥
करिष्यमाणयात्राया यथाकालम् सुखम् मया ।
तत्रनिर्विघ्नकर्त्रीत्वं भव श्रीरामपूजिता ॥
अशी प्रार्थना केली जाते. याचा अर्थ आहे “ शमी वृक्ष पापांचा नाश करतो. लाल रंगाचे काटे असलेला हा सुंदर वृक्ष रामप्रभूंचा आवडता वृक्ष आहे. पांडवांनी या वृक्षावर आपली शत्रे लपवली होती. ज्याला राम पुजतो अशा हे शमी वृक्षा मी माझ्या विजयाच्या मार्गावर निघालो आहे. माझा हा प्रवास सुखकर, आनंदी आणि अडचणी आणि अडथळे रहित असा तू कर.”
शमीची विविध भाषांमधील नावे …
अरबी- घफ, राजस्थानी- खेजरी, बिश्नोई [ वीस आणि नऊ तत्वांचे अनुपालन करणारे ते ]- जांटी, पंजाबी- जंड, सिंध- कांडी, कन्नड किंवा कानडी भाषेत- बन्नी, तमिळ- वन्नी, तेलुगु- जम्मी, मराठी- शमी, गुजराती- सुम्री, सिंहली [ श्रीलंकेतील सिंहली लोकांची भाषा]- वन्नी-अंडारा, कटू अंडारा ……..UAE म्हणजे युनायटेड अरब एमिरेट्स या देशाचा हां राष्ट्रीय वृक्ष आहे ……. विचार करा मित्रांनो ……पूर्वी प्राचीन भारत कसा असेल इतकेच आज सांगतो ………
शमीच्या कच्च्या फळांची भाजी खातात. शमीची पाने गुणांनी रुक्ष आणि तुरट असून रक्तपित्त, जुलाब यावर उपयोगी आहेत.
शमीच्या सालाचा कुष्ठरोग, जखमा, पोटाचे विकार, दमा यावर उपयोग केला जातो. बिया या शरीरातील रक्तातल्या साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी उपयोगी आहेत.
मानसिक विकार, स्किझोफ्रेनिया अशा मनाशी आणि मेंदूशी संबंधित विकारांवर शमीचा आयुर्वेदात उपचार सांगितलेला आहे. शमीची साल वातशामक असल्याने सांधेदुखीमध्ये आणि संधीवातामध्ये हिचा उपयोग होतो.
शमीच्या शेंगांचा उपयोग लघवी आणि लैंगिक विकारांसाठी केला जातो.
गर्भ अवेळी पडण्याच्या विकारात शमीची पाने साखरेबरोबर खाल्ली असता फायदा होतो.
शमीचे फळ पचायला जड, रुक्ष, गुणाने उष्ण आणि केसांना हानिकारक आहे. या फळांनी केस नष्ट होतात. अर्थातच शमीचे हे औषधी उपयोग आणि वापर तज्ञ वैद्य-डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि मार्गदर्शनाखाली करावा. स्वत:चे स्वत: प्रयोग करणे हानिकारक आहे हे नक्की लक्षात ठेवावे.
पाण्याच्या शोधासाठी शमीची मुळे ३५ मीटर पर्यंत खोल जातात. शमीच्या मुळांमुळे भूमीत नायट्रोजनचे प्रमाण वाढते. त्यामुळे जमीन सुपीक होते. शमीच्या वृक्षाचा उपयोग एखादे सुपीक ठिकाण जर कोरडे, वाळवंटी होत असेल तर त्याच्या तपासणी साठी केला जातो.
ऋग्वेदानुसार शमीच्या वृक्षात आग निर्माण करण्याची क्षमता आहे. ऋग्वेदातील एका कथेनुसार चंद्रवंशीय राजा पुरू याने शमी आणि पिंपळ यांच्या लाकडांनी घासून आग निर्माण केली होती. शमीचा उत्तम प्रतीचा कोळसा बनवण्यासाठी सुद्धा अप्रतिम उपयोग होतो. शमीच्या लाकडापासून नांगर सुद्धा बनवला जातो. शमी हा एक यज्ञीय वृक्ष आहे. म्हणजे यज्ञामधे समिधा म्हणून शमीचे लाकूड वापरले जाते. गणेश पूजनासाठी शमीची पत्री म्हणजे पाने जशी महत्वाची आहेत तशीच ती शनीच्या पूजेसाठी सुद्धा आवश्यक आहेत. शमीचे भस्म शनीचा त्रास किंवा शनी ग्रहाची पीडा दूर करण्यासाठी धारण करावे. दुर्गापूजेसाठी सुद्धा शमीची पाने उपयुक्त आहेत. इतकेच काय असे म्हंटले जाते की कवी कालिदास या महान कवीने शमीच्या वृक्षाखाली बसून तपश्चर्या केली होती आणि ज्ञानप्राप्ती करून घेतली होती. बिहार आणि आसपासच्या राज्यांमध्ये शमीला अतिशय पवित्र मानतात आणि घराच्या दरवाजाच्या उजव्या बाजूला शमीच्या झाडाची छोटी टहाळी लावली जाते. राजस्थानातील खेजराली गावात राहणारे बिष्णोई समाजाचे लोक या वृक्षाला जीवापाड जपतात आणि “चिपको” आंदोलनाच्या वेळी अमृतादेवी यांच्या नेतृत्वाखाली ३६३ बिष्णोई लोकांनी हे वृक्ष कापले जाण्यापासून वाचवण्यासाठी आत्मसमर्पण केले आहे. या बिष्णोई समाजाबद्दल मी एखाद्या स्वतंत्र लेखामधून मी त्यांची माहिती आपणा समोर मांडेन मित्रांनो. असो.
मग अशा या पवित्र वृक्षाची पूजा करायची नाही का? बघा आपले हिंदूंचे सण निसर्गाशी किती किती जोडलेले आहेत. माणसाला निसर्गावर डोळसपणे प्रेम करायला शिकवणारे आहेत. जीवनदृष्टी देणारे आहेत. आपण फक्त त्यांचा अर्थ समजून घेऊन त्याचे अनुसरण, अवलंबन करणे आवश्यक आहे माझ्या मित्रांनो ……
पुन्हा भेटू मित्रांनो नवीन विषयासह ….
नेहमीच आपला मित्र,
Dr. हेमंत सहस्रबुद्धे उर्फ कलादास ………